चपराक

एकदा टपरीवर खरं
अचानक भेटला होता देव
“हवा पाणी हाय का बरं?”
सलगी कराया झाली माझी उठाठेव

तिरस्कार थुंकून डोळ्यातनं मग
दिली जोरात ठेऊन चपराक त्यानं
“का कावलायस आज उग?”
विचारलं मी पुसत त्याची पाचही बोटं

“कारट्या, केवढी सुरेख रे होती
कोरली तुमच्यासाठी सारी सृष्टी
रक्तानं सारवून, धुळीनं माखून
गटारात घातलासा की रे ही पृथ्वी”

“म्या काय एकटा करणार एवढ्या जनात?
म्या कुठं काय बी नाही पेटवली काडी?”
“आग कशी नाही पेटत तुझ्या मनात,
म्हणूनच काढला लेका जाळ कानाखाली”

महत्त्वाकांक्षा

असंच एकदा कधीतरी

भर उन्हात दुपारी

रिकाम्याश्या रस्त्यालगत

बंद दुकानाच्या फळीवर

हाताची उशी करून

पाय जरा मोकळं पसरून

तास दोन तास तरी

मस्त ताणून देण्याची

महत्त्वाकांक्षा उरात

बाळगून आहे जोरात

आठवण

अधून मधून पावसात
जाणवते एक कमजोरी
तुझ्या सोबत घेतलेल्या
काही श्र्वासांची शिदोरी
आणि व्यक्त ना केलेल्या
काही भावनांची साठवण
घेऊन कोसळते सर जेव्हा
अश्रुत चिंब तुझी आठवण

राजगडाची रात्र

किती डोळ्यात वाट
आता झाली पहाट
आला पहिला प्रहर
देवा, का हा कहर?

तो औरंग्या शापित
त्याचा मुठीत काबीज
झाला अर्धा मुलुख
काय करल तो सुलुख?

रोवलंय माझ्या लेकरानं
स्वराज्यचं अनमोल बीज
तोवर नाही त्याला निज
त्याची तुला काय चीज?

नको चांदणं अंगणात
माझ्या छाव्यास ते दाव
त्याचं पाऊल जंगलात
तोवर तू पाण्यात

Jijamata endured a long and harrowing silence, with weeks of rumours whispering Shivaji’s recapture or worse, his death, as he travelled in disguise through hostile Mughal territory after his daring escape from Agra. This is an attempt to pen a sleepless night for a deeply devout parent who had already endured the loss of one son.

मध्यान्ह

भर दुपारी उन्हात
आयुष्याचं मध्यान्ह जाणवलं
संध्याकाळ होणार आता
ह्या विचारानं घर मांडलं
थोडसं का होईना मग
काळजात कसं धस्स झालं

सकाळपासून दंगा घालण्यात
कसं अर्ध जगणं संपलं
मनाला नाही मानवत मात्र
अधून मधून थकल्यासारखं वाटतं
वळते तोपर्यंत वळवायची आता मूठ
घाण्याबाहेर बैल जाणार कुठं

देणं

सावली बि गिळून

सांज गेली ढळून

तिच्या संगं जळून

आणि यक सपान

इस्कटल्यालं नशीब

उतरवलं थोडं ऋण

मागच्या येका जन्माचं

असंल राहिलेलं देणं

शिंपल्या

कुठे सरले दिस
जीव होतो कासावीस
भरून आलं उरात
मोठी एक शंका मनात
आहेस तु खरंच आठवण
की अर्धवट एक खोटं स्वप्न

माझ्या आयुष्याच्या गलबल्यात
टिकल्या नाहीत तुझ्या कविता
उगाच नाही काठावर आता
कुठेच मिळत जोड्या
विखुरल्यात सर्वत्र फक्त
तुटलेल्या एक एक शिंपल्या

गोष्ट

हिरव्यागार खोऱ्यात
जसं गवताचं पातं
तुझी आठवण
रमली माझ्या मनात

तुझी संगत 
साधायचं जसं वेडं 
तसच व्याकूळ
होतं आजही थोडं 

सांगायचं म्हटलं
तर गोष्ट साधीच
शेवटची पानं
बरी आहेत अर्धीच

भुरळ

धुक्यामध्ये धुकं हरवलं
माझं मन तुझ्यात गुंतलं
आरश्यात कोण उभं
माझं मलाच झालं परकं

खळी तुझ्या गालावर
मग माझी का सावरा सावर?
डोळ्यात तुझ्या काजळ
हृदयात माझ्या का वावटळ?

तुझ्या वेणीतलं फुल
त्याच्याशी ही माझी जळजळ
तुझ्या पायातलं पैंजण
तुझी आणखी एक आठवण

कसा होणार सांभाळ?
कधी होणार तुझ्याशी मेळ?
किती करशील माझा छळ?
उतरेल का कधी तुझी भुरळ?

आयुष्यात आणखी काय हवंय?

एका हातात भाजलेलं कणीस
दुसऱ्या हातात गरम भजी
वरती ढगांची चादर
खाली पाय पसरायला रिकामा डोंगर
विचारांचा कालवा विरघळायला लागतो
तेवढाच हवेत गारवा
मातीचा सुगंध येईल तितका
पण छत्री लागणार नाही इतका पाऊस
अशा संध्याकाळी कविता करायची सवय
बस, आयुष्यात आणखी काय हवंय?