गराडा

विणलेस तू विश्व जसे
अगणित तीत कण असे
की कणाकणात विश्व वसे
पाहून तुझवर विश्वास बसे

पण नको बोलवूस मंदिरात तुझ्या
जमणार नाहीत त्या पूजा आर्च्या
व्यर्थ नाहीत का रे त्या साऱ्या आरत्या?
जिथे भक्तच तुझा दगड झाला रे वाल्या

कुठे भूमीवरच्या अदृश्य रेषांसाठी
रक्ताच्या थारोळ्यात कित्येक बळी
तर कोणी खेळतंय रक्ताचीच होळी
करून आपापल्या देवावर खेळी

कुठे द्रव्यामागे आहे बेलगाम धावपळ
तर कुठे दाण्याविना पोटात नुसतीच कळ
कुठे आवाढव्य महालात अगणित झुंबर
तर कुठे विसावण्यास नाही गळके सुद्धा छप्पर

म्हणून जोडतो हात कर दगड मज तुझ्यासारखा
नाहीतर पूर्ण कश्या करू स्वतःच्या आकांक्षा
जेव्हा आहे आजूबाजूला विखुरलेला
असंख्य अपूर्ण अगतिक स्वप्नांचा गराडा?

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.