वाट

झाडा फुलावेलींनी सजलेली ही वाट
निघुन दारासमोरून माझ्या हरवते जंगलात
सदा पक्ष्यांचा इथे येईल ऐकु कलकलाट
खेळून याच वाटेवरती वारा येतो माझ्या घरात

ह्याच वाटेवरती वचन दिलेस तू मला
“निघते आता, येईन फिरुनी पुन्हा एकदा”
दिवस गेले, गेल्या रात्री, ऋतू बदलले अनेकदा
गेले थकून डोळे देखील तुला शोधता शोधता

ना तू कुठे दिसलीस, ना तुझी सावली
वाट बघुन तुझी , ही वाट देखील थकली
“फिरतील का रे तिची पाऊले?” अशी शंका तिला आली
“अंधाऱ्या या जीवनात तुझ्या होईल का रे पहाट तिची?”

तू भेटशील पुन्हा, आहे विश्वास मला
कधी चेहऱ्यांच्या, कधी शब्दांच्या जगात शोधतोय तुला
नाहीस कुठेच तू , होते पुन्हा निराशा
निघते हृदयातुन मग आणखी एक कविता

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.